More Sensational News

Saturday, 24 September 2011

आदळला एकदाचा यूएआरएस

अरिष्ट टळले : नासा घेतेय उपग्रहाच्या अवशेषांचा शोध

केप कॅनाव्हरल। दि. २४ (वृत्तसंस्था)

गेल्या वीस वर्षांपासून अंतराळात भटकत असलेला ‘नासा’चा यूएआरएस उपग्रह अखेर आज पृथ्वीवर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. नासाने हा उपग्रह कोसळल्याला दुजोरा दिला असला तरी तो नेमका कोणत्या ठिकाणी कोसळला, याचा पत्ता नासालाही लागलेला नाही.

पृथ्वीच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी १९९१ मध्ये डिस्कव्हरी यानातून ६.५ टन वजनी ‘यूएआरएस’ उपग्रह अंतराळ प्रक्षेपित करण्यात आला होता. १४ वर्षे व्यवस्थित कामगिरी बजावणारा हा उपग्रह २00५ मध्ये निकामी झाला होता.

हा उपग्रह कोठे कोसळला आणि पृथ्वीच्या कक्षेतील त्याचे पुनरागमन याची नेमकी माहिती अजून उपलब्ध नाही, असे नासातर्फे सांगण्यात आले. पश्‍चिम कॅनडाच्या दक्षिणेकडील ओकोटोक्स गावात या उपग्रहाचे तुकडे पडल्याचे सांगण्यात येते.

यूएआरएसची लांबी १0.६ मीटर आणि व्यास ४.५ मीटर होता. १४ वर्षांत या उपग्रहाने बाह्य वातावरणातील ओझोन आणि इतर रासायनिक पदार्थांसंबंधी बरीच माहिती मिळवली होती. नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे केल्या काही वर्षांपासून हा उपग्रह पृथ्वीकडे वेगाने येत होता.

शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत शिरताच तुकडे-तुकडे होत हा उपग्रह नष्ट झाला. नासाच्या माहितीनुसार कॅनडा, आफ्रिका, प्रशांत आणि अटलांटिक महासागरावरून हा उपग्रह भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी ८.५३ ते १0.३९ वाजेदरम्यान पृथ्वीवर कोसळला.