More Sensational News

Thursday, 29 September 2011

सचिन तेंडुलकर स्वप्नातल्या घरात...


सचिन तेंडुलकर स्वप्नातल्या घरात...

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २८ - भारताचा विश्वविक्रमी महान फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बुधवारी आपल्या मालकीच्या नव्या को-या बंगल्यात प्रवेश केला. मुंबईतील वांद्रे परिसरातील पेरी क्रॉस रोडवर हा नवा टुमदार बंगला बांधला आहे. या आधी तो वांद्रे येथेच ला मेर हाउसिंग सोसायटीत राहात होता. सचिनचा नवा बंगला तब्बल सहा हजार चौरस फूट परिसरात बांधला आहे.

आपले स्वतःच्या मालकीचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. माझीही तशी इच्छा होती व आता माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. वांद्रे येथील सोसायटीतील माझा सध्याचा फ्लॅट हा खेळाडू आरक्षणातून मिळाला होता. तो आता रिकामा करून मी नव्या घरात जात आहे, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.

नव्या घराची गृहशांती आणि वास्तूपूजा इंग्लंड दौ-यावर जाण्याआधी ११ जून रोजीच उरकली होती. त्यानंतर पुन्हा मुंबईला येणेच शक्य झाले नाही. आता मी मुंबईत आहे. आईला मी नवे घर दाखवण्यासाठी आणले आहे. या घरात मी काही काळ राहिलोही आहे. पण मुलांना आणता आले नव्हते, असे तो म्हणाला.

सचिनने २००७मध्ये या ठिकाणचा एक मोडकळीला आलेला बंगला ३९ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्या जागी नंतर त्याने स्वतःच्या स्वप्नातील महाल उभारला आहे.

या नव्या बंगल्याच्या भोवती उंच भिंती उभारल्या असून सीसीटीव्ही तसेच सेन्सर्स लावले आहेत. तीन मजली असलेल्या या बंगल्यात सचिनच्या आवडीनिवडींचा विशेषत्वाने विचार केला आहे. या बंगल्यात दोन बेसमेंटही आहेत. या बंगल्यात सचिनची बेडरूम सर्वात वरच्या मजल्यावर तर त्याच्या दोन मुलांच्या बेडरूम्स दुस-या मजल्यावर आहेत. त्यानंतर खालच्या दोन मजल्यांवर गेस्ट रुम्स आहेत.

या बंगल्याच्या दिवाणखान्याला त्याला मिळालेल्या विविध पुरस्कारांनी सजवले असून अन्य सर्व सुखसोयीही त्याच्या लौकिकाला साजेशा अशाच बनवल्या आहेत.