More Sensational News

Friday, 6 January 2012

तिरुपतीच्या दारी पासेसची 'हेराफेरी'

तिरुमला, दि. ६ - देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुपती देवस्थान हजारोंच्या संख्येने व्हीआयपी पासेसची खिरापत वाटल्याप्रकरणी वादाच्या भोव-यात सोपडले आहे. गुरुवारच्या वैकुंठ एकादशीनिमित्त करण्यात आलेली व्यवस्था ढिसाळ होती असा आरोप करण्यात येत असतानाच पासेसच्या वितरणावरुनही नवा वाद निर्माण झाला आहे. मंदिरामध्ये धार्मिक विधी करण्यासाठी नेहमी ५०० रुपयांना व्हीआयपी पास देण्यात येतो. यावेळी या महत्त्वाच्या व्यक्तिंच्या पासेसखेरीज व्हीव्हीआयपी किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी १००० रुपयांचे पास देण्यात आले. यातली आणखी खेदाची बाब म्हणजे ५०० रुपयांचे पास पाच ते १० हजार रुपयांना भलत्याच लोकांना विकण्यात आले. याप्रकारे सुमारे १० हजार पासेस विकण्यात आल्याचे सूत्रांचे सांगणे असून तिरुपती देवस्थानच्या अधिका-यांच्या सहभागाशिवाय या प्रकारचा गैरव्यवहार होणे शक्य नसल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.
तिरुपती देवस्थानच्या व्यवस्थापनाबाबत अनेक प्रतिष्ठितांनीही नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट अभिनेता मोहन बाबू, काँग्रेसचे खासदार रायापती सांबाशिवा राव आणि आमदार के रामकृष्ण यांनी देवस्थानचे व्यवस्थापन आतापर्यंतचे सर्वात ढिसाळ असल्याची टीका केली आहे. अनेक व्हीआयपींमुळे संपूर्ण परीसरात वाहतूक ठप्प झाली तर अनेक भक्तांची राहायची तर सोडाच साध्या दर्शनाचीही सोय झाली नाही. विशेष म्हणजे यावेळी व्हीआयपी पास देणार नाही असे जाहीर केलेल्या देवस्थानने प्रत्यक्षात मात्र इतके व्हीआयपी पासेस विकले की अनेक ख-या व्हीआयपींना दर्शनासाठी प्रचंड ताटकळावे लागले. व्हीआयपी कोट्याचा विचार केला तर केवळ सहा मंत्री, चार न्यायाधीश आणि दोन केंद्रीय मंत्री खरेतर उपस्थित होते. संपूर्ण व्हीआयपी कोटा जरी विचारात घेतला तरी ती संख्या ३०० पेक्षा जास्त नसते, परंतु यावेळी प्रत्यक्षात मात्र हजारोंच्या संख्येने व्हीआयपी पासधारक आले होते. त्यामुळे जे व्हीआयपी नाहीयेत अशांनाही हे पासेस विकण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचे एक आमदार मुद्दूकृष्णा नायडू यांनी व्यक्त केली.
हा सगळा गोंधळ पहाटे दोनच्या सुमारासच सुरू झाला. दोन वाजता व्हीआयपींचे दर्शन सुरू झाले, जे चार वाजता संपणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मात्र सहा वाजून गेले तरी व्हीआयपींची रांगच संपेना. त्यामुळे व्हीआयपी आणि साधारण अशा दोन्ही भक्तांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागले. एकवेळ तर अशी आली की पोलीसांनाही व्हीआयपींच्या रांगेवर नियंत्रण राखणे अशक्य झाले आणि साधारण भक्तदेखील गर्दीचा नी ढिसाळ व्यवस्थापनाचा फायदा घेत व्हीआयपींच्या रांगेत घुसले. याबरोबर व्हीआयपी नसलेल्या व्यक्ती आपल्या रांगेत घुसताहेत अशी आरडाओरड व्हीआयपींनी सुरू केली. या सगळ्याचा परिणाम मात्र अनेक ख-या भाविकांसाठी मात्र त्रासदायक ठरला. पायी संपूर्ण टेकडी चढून गेलेल्या अनेक भक्तांना देवाचे दर्शन न घेताच माघारी यावे लागले.