More Sensational News

Thursday, 22 December 2011

हिमालय शिवरायांच्या प्रतीक्षेत

वयाच्या सातव्या वर्षापासून मातीला आकार देण्याचा ध्यास घेतला. पण, ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटातून माझी शिल्पकला खर्‍या अर्थाने उदयास आली. वयोमानामुळे आता माझा हात थकतो, तरी अजून एक स्वप्न साकारायचे आहे. महाराष्ट्राचे शक्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा हिमालयाच्या पायथ्याशी उभारायचा आहे... वयाच्या ८६व्या वर्षीदेखील तेवढय़ाच उत्साहाने बंडोपंत खेडकर सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५ पुतळे व एकूण चारशे पुतळे तयार करण्याचा विक्रमच त्यांनी केला आहे. आतापर्यंत असंख्य सत्कार झाले. पण, लोकमतच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते गौरव होणे हे मी माझे भाग्यच समजतो., अशी कृतज्ञता खेडकर यांनी व्यक्त केली. १२ वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरही त्यांची शिल्पकला थकलेली नाही. एका हाताने ते शिल्प घडवत असतात. आपल्या संरक्षणासाठी सीमेवर पहारा देणार्‍या जवानांना स्फूर्ती देणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा खेडकर यांनी पुण्यातील आपल्या कार्यशाळेत तयार केला आहे. हा पुतळा हिमालयाच्या पायथ्याशी उभारायचे तेवढेच स्वप्न उरले आहे, अशी मनीषा ते व्यक्त करतात.