विधानसभेत बेळगाव मुद्याला तोंड फुटल्यावर भुजबळ अत्यंत आक्रमक वाटत होते. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून बेळगाव महापालिका बरखास्तीचा मुद्दा मांडला. त्याचवेळी भुजबळ बोलण्यासाठी उभे झाले. या मुद्यावर आपण सर्व एक आहोत, हे दाखवून देण्याचा हा प्रसंग असल्याचे सांगत सभागृहाचे कामकाज तहकूब करावे, अशी मागणी त्यांनी केली. ठरावावरील चर्चेत बोलताना भुजबळ यांनी एकमुखानेच ठराव मंजूर झाला पाहिजे, अशी भावना मांडली. 'कर्नाटक सरकारच्या कृतीवर विधानसभेने वारंवार संताप व्यक्त केला आहे. सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. तुरुंगवास भोगला. लाठ्या-काठ्या खाल्ल्या. 1979 च्या आंदोलनात अनेकांसाठी बलिदानही दिले. गेली 55 वर्षे हा प्रश्न सतावतो आहे. काहीच झाले नाही. अनेक नेत्यांसाठी या प्रश्नावर लढा दिला'', असे सांगताना भुजबळ यांनी एन. डी. पाटील, बाळासाहेब ठाकरे, विनोद घोसाळकर, शिशिर शिंदे, बॅ. अंतुले यांच्यासह अनेक नेत्यांचा आवर्जून उल्लेख केला. ""शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या लढ्यात स्वतःला झोकून दिले'' या भुजबळ यांच्या उल्लेखाने त्यांच्यातील माजी शिवसैनिक जागा झाल्यासारखे वाटत होते.
'खराब कामगिरीचा ठपका ठेवून बेळगाव महापालिका बरखास्त करण्यात आली'' असे सांगून भुजबळ यांनी ""काळा दिवस पाळण्याचा घटनादत्त अधिकार बेळगावच्या महापौरांना नाही काय?'' असा सवाल उपस्थित केला. 'सीमाप्रदेशात मराठी भाषिकांची अक्षरशः गळचेपी सुरू आहे. आम्ही चूप बसणार नाही. गळचेपीचे प्रकार रोखण्यासाठी तो केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे. बेळगाव महापालिका तत्काळ पुनर्स्थापित झाली पाहिजे'' असेही भुजबळ म्हणाले.